Skip to main content

नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा बोधचिन्हाचे अनावरण

📅 May 29, 2026

 
२०२७ मध्ये नाशिक त्र्यंबकेश्वर येथे आयोजित सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृह येथे बुधवारी करण्यात आले.
 
यावेळी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, उद्योग मंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, नाशिक विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह यांच्यासह विविध आखाड्यांचे साधू, संत उपस्थित होते. (Nashik Kumbh Mela 2027)
 
कुंभमेळा प्राधिकरणाच्यावतीने कुंभमेळ्याच्या लोगोसाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सुमारे ३ हजारांहून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला. या स्पर्धकांमधून ३ उत्कृष्ट स्पर्धकांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये प्रथम क्रमांक पटकावलेल्या पुणे येथील सुमित काटे यांना ३ लाख रुपयांचा धनादेश आणि सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांक पटकावलेल्या नोएडा येथील मयांक नायक यांना २ लाख रुपयांचा धनादेश आणि सन्मानचिन्ह आणि तृतीय क्रमांक पटकावलेल्या पंढरपूर येथील पीयुष पिंपळनेरकर यांचा १ लाख रुपयांचा धनादेश आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
 

 
बोधचिन्हविषयी माहिती
 
नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण, ‘मायगव्ह’ आणि ‘असोसिएशन ऑफ डिझाइनर्स ऑफ इंडिया’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या देशव्यापी डिझाइन स्पर्धेतून या बोधचिन्हाची निवड करण्यात आली. हे बोधचिन्ह नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या पवित्र भूगोल आणि धार्मिक परंपरांवर आधारित आहे. भगवान शंकराचे त्रिशूळ: आध्यात्मिक उर्जेचे प्रतीक. त्र्यंबकेश्वर मंदिर: प्रादेशिक वारशाचे दर्शन घडवणारी मंदिराची प्रतिकृती. काळाराम मंदिराची कमान आणि गोदावरी नदी: गोदावरी नदीला ‘शिवलिंगा’च्या रूपात दर्शविण्यात आले असून, ते कुंभमेळ्यातील पवित्र स्नानाच्या परंपरेचे महत्त्व अधोरेखित करते.